Marathi Essay on Self-reliant India, Self-reliant India Information in Marathi | आत्मनिर्भर भारत मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Self-reliant India | Atmanirbhar Bharat | Atmanirbhar Bharat – Kalachi Garaj ? . आत्मनिर्भर भारत – काळाची गरज ? मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

आत्मनिर्भर भारत – काळाची गरज ?

” स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाही व मनगटासारखा राजदंड सुद्धा नाही ” असे म्हटले जाते . याचा अर्थ असा होतो की , स्वतःस आपल्या मनाप्रमाणे वागण्यास मोकळीक असावी व स्वतःच्या अंगी सामर्थ्य असावे म्हणजे सर्व गोष्टी साध्य होतात. ‘आत्मनिर्भर ‘ याचा शब्दशः अर्थ स्वावलंबी असा आहे . आपण स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि आपल्या स्वत: च्या सामर्थ्यावर कार्य करणे म्हणजेच आत्मनिर्भर असणे होय . स्वबळावर केलेली क्रिया म्हणजे आत्मनिर्भरता होय .

‘उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्’ ही भगवद्गीतेतील मांडणी किंवा ‘अप्प दीप भव’ हा महात्मा गौतम बुद्धांचा संदेश, या सर्वातील समान दृष्टी लक्षात घेतली, तर ‘आत्मनिर्भर भारता’ची कल्पना नवीन, म्हणजे अ-परिचित वाटण्याचे कारण नाही. ‘जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे : उदास विचारे वेच करी’ ही समर्थ रामदासांची शिकवण ज्या प्रमाणे आपल्या सामर्थ्याचे, समृद्धीचे अंतिम लक्ष्य विश्वकल्याणाचे आहे हे अधोरेखित करते, तोच आशय भारताच्या आत्मनिर्भरतेचा आहे.

२१ वे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे . जगभरात तंत्रज्ञानामुळे अगणित प्रगती झाली आहे. अनेक देशांनी प्रगतीचे उंच शिखर गाठले आहे. अर्थात आपला भारत देश सुद्धा प्रगाती पथावर वाटचाल करत आहे . आता भारताचा उल्लेख ‘विकसनशील देश’ म्हणून होणार नाही असे विश्व बँकेनं घोषित केले आहे. परंतु सद्यस्तिथीत आपला भारत देश हा अजूनही पूर्णपणे विकसित देश झालेला नाही . त्यामुळे आत्मनिर्भर भारत ही काळाची गरज आहे असं नाही का वाटत ?

‘उद्धरावा स्वये आत्मा!’ ही सनातन भारतीय दृष्टी आहे. आपल्या उद्धारासाठी आणखी कोणीतरी कोठून तरी येतील ही, ‘असेल माझा हरी…’ पद्धतीची विचारसरणी नाकारून, ज्याचा तोच किंवा ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही शिकवण आपल्या देशात अनेकांनी जनमानसात रुजविण्याचे प्रयत्न केले आहेत. ‘आत्मनिर्भर भारता’ची हाक ही त्याच परंपरेतले पुढचे पाऊल आहे.

सुरुवातीच्या काळात भारत परावलंबी होता. भारतात लागणाऱ्या दैनंदिन गरजेसाठी बाहेरच्या देशांतून वस्तूंची आयात करावी लागत असे . भारताचे आर्थिक उत्पन्न इतर देशांच्या तुलनेत फार कमी होते. वर्गीकरण हे व्यक्तीचे उत्पन्न, जीडीपी, राहणीमान, शिक्षणाची पातळी, आयुर्मान इ. वर केले जाते. त्यामुळे भारत देशाचे त्यांच्या उत्पन्नाच्या आधारावर ‘लो इन्कम देश’ (कमी उत्पन्न गट) किंवा अर्थव्यवस्था असे वर्गीकरण करण्यात आले होते. परंतु आता आपल्या भारत देशाचा दर्जा बदलला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतर विकसनशील देशांपेक्षा चांगली आहे, परंतु ज्या देशांचे अद्याप विकसित देश असल्याचे संकेत दिसत नाही त्यांना नवीन औद्योगिक देशांच्या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारताला ‘लोअर मीडल इन्कम’ (मध्यम उत्पन्न गट )असणाऱ्या देशांसोबत सामील करण्यात आले आहे.

अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आपण पूर्वीच आत्मनिर्भर झालो आहोत, पण ऊर्जा, पाणी, संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान, औषधनिर्माण अशा अनेक क्षेत्रांत आपण आणखी आत्मनिर्भर होण्याची गरज आहे.त्यासाठी स-कुशल मनुष्यबळ निर्माण करावे लागेल.महाराष्ट्रात केळी, द्राक्षे, संत्री, आंब, स्ट्रॉबेरी अशी फळफळावळे मोठ्या प्रमाणात होतात, पण फळ प्रक्रियांची मोठी केंद्रे तयार झाली, तर शेतकऱ्यांना अधिक चांगले उत्पन्न मिळू शकेल. कापूस, भात अशा पिकांच्या बाबतीतही हेच आहे.

अन्न प्रक्रिया, सेंद्रिय शेती, लोह, ऍल्युमिनियम व तांबे, कृषि-रसायने, इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक यंत्रसामग्री, फर्निचर, चर्मोद्योग व विशेषतः पादत्राणे, ऑटोमोबाइल पार्ट्स, वस्त्रोद्योग व मुखावरणे, सॅनिटायझेन आणि वेंटिलेटर्स या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करायला हवी . उद्या चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना आकर्षून घ्यायचे असेल, तर तशा सोयी-सुविधा व तशीच धोरणेही असावी लागतील.

भारताचे पंतप्रधान माननीय मोदी असे म्हणाले की , ‘आपल्याला आनंद आणि समाधान देण्याबरोबर आत्मनिर्भरता आपल्याला सामर्थ्य देखील देते. २१ व्या शतकाचे भारताचे शतक बनविण्याची आपली जबाबदारी केवळ स्वावलंबी भारताच्या संकल्पातूनच पूर्ण होईल. या जबाबदारीमुळे केवळ १३० करोड कोटी देशवासीयांच्या जीवनशक्तीतून ऊर्जा मिळेल.

सगळ्यांनीच एकमेकांची साथसंगत केली किंवा घेतली, तरच सर्वांचा विकास शक्य आहे, असा संदेश सामाजिक व राष्ट्रीय स्वावलंबनाचा आहे. जवळ जवळ हीच भूमिका ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ घडविण्याचा आहे.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *