Marathi Essay on Rakshabandhan, Rakshabandhan Information in Marathi | रक्षाबंधन मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Rakshabandhan. रक्षाबंधन मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…

रक्षाबंधन – बहीण भावाचे पवित्र बंधन

‘राख म्हणजे सांभाळ ‘. “राखी” या शब्दातच ‘रक्षण कर’ हा संकेत आहे. कोणत्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे अर्थात स्त्रीचे रक्षण करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा धर्म आहे. या दिवशी स्त्रिया रेशमी धागा आपल्या रक्षणार्थ तत्पर असलेल्या करारी पुरुषाच्या अर्थात आपल्या भावाच्या हाती बांधून संरक्षणाचे अभय मागतात आणि पुरुष आपल्या बहिणीस सदैव रक्षणाचे वचन देतो . हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी साजरी करतात. याच दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात.

नाते गुंफले हे रेशमी धाग्याने
वास्तल्य आपुलकी अन् जिव्हाळ्याने
सदैव टिकावे हे बंध नात्याचे
बहीण – भावाच्या निर्मळ प्रेमाचे

श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. हा सण बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणून ओळखला जातो. श्रावण पोर्णिमेस बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस ‘पवित्रारोपण’ असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा,त्याच्या जीवनात सदैव आनंदाने वास करावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.

पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले.इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) हे रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीचा किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले.

राखी एक प्रतीक पवित्र नात्याचे
बहीण – भावाच्या अपार प्रेमाचे

आपल्या भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे पवित्र बंधन होय. राखी ही बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक मानले जाते. या जगात आईवडिलांनंतर श्रेष्ठ असलेलं नातं म्हणजे बहिण-भावाच नातं होय. हे नाते नितळ आणि निखळ प्रेमावर आधारित आहे. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते.

रक्षाबंधनाचा सण म्हणजे हा एक प्रकारे दृष्टी परिवर्तनाचा सण असेही आपण म्हणू शकतो. कारण राखी बांधणार्‍या बहिणीकडे एखादा पुरुष विकृत नजरेने पाहत नाही. अर्थातच बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. बहिणीच्या सुखदुःखात तो खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहतो तसेच बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. समाजातील वाईट प्रवृत्तींपासून तिचे नेहमी रक्षण करतो. पूर्वजांनी या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सम्मान हा सुद्धा या सनामधून दिलेला उपदेश होय.

प्रख्यात भारतीय लेखक रवींद्र नाथ टागोरांचा असा विश्वास होता की,” रक्षाबंधन हा फक्त भाऊ-बहिणींमधील संबंध दृढ करण्यासाठीचा दिवस नाही तर या दिवशी आपण आपल्या देशवासियांशी असलेले संबंधही बळकट केले पाहिजेत”. भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण रूढ झाला आहे. सर्वाना एकत्र जोडणाऱ्या सणाची परंपरा वर्षानुवर्षे वृद्धिंगत झाली आहे . आणि आजही आपण सगळेजण ही परंपरा जपत आहोत.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *